spot_img
spot_img

BIG POLITICAL WAR! भोजराज पाटलांचा ‘अपमान’ अन् विजयराज शिंदेंच्या माघारीचं गुपित काय? श्वेता महालेंनी भरमंचावर काढला आम.संजय गायकवाडांचा ‘राजकीय हिशेब’; “शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?” बुलढाण्यात महायुतीच्या पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे? श्वेता महालेंनी उघडली ‘जुनी फाईल’! माहिती अधिकाराच्या अर्जांतून कार्यकर्त्यांना त्रास देऊन पक्षप्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार श्वेता महाले यांनी महायुतीतील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे नाव घेत जोरदार राजकीय हल्लाबोल केला. भाजप कार्यकर्त्यांवर दबाव टाकणे, कामांच्या बदल्यात शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घालणे, खोट्या गुन्ह्यांत अडकविणे आणि पक्षापेक्षा स्वतःचा परिवार मोठा करण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर आरोप त्यांनी केले. महाले यांच्या या आक्रमक भाषणामुळे बुलढाण्यातील महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आता थेट चव्हाट्यावर आला आहे.

देऊळघाट परिसरातील नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना महाले म्हणाल्या, “भाजप आपला पक्ष वाढविण्यासाठी कोणाच्याही गळ्यात बळजबरीने पक्षाचा रुमाल घालत नाही. चौकशांचा धाक दाखवणे, माहिती अधिकाराच्या अर्जांतून त्रास देणे आणि नंतर पक्षप्रवेशासाठी दमदाटी करणे, ही भाजपची संस्कृती नाही.” हा टोला त्यांनी थेट आमदार गायकवाडांना लगावला.

“बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. त्यांना अडचणीत आणून खोट्या विनयभंग अथवा ॲट्रॉसिटीच्या प्रकरणांत अडकविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काम घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांना ‘आधी भाजप सोडा, शिवसेनेत या; त्यानंतरच काम करू,’ असे सांगितले जाते,” असा खळबळजनक दावा महाले यांनी केला.

यानंतर त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही गायकवाडांना लक्ष्य केले. “आमदारही मीच, नगराध्यक्षही माझ्याच घरातील, गटनेताही घरातील, जिल्हा परिषद अध्यक्षही घरातील आणि पुढे खासदारही व्हायचे! मग वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या शिवसैनिकांनी नेमके काय करायचे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. स्थानिक शिवसैनिकांना ताकद देण्याऐवजी मुलगा, पत्नी आणि कुटुंबीयांना पुढे केले जात असल्याचा आरोप करत, “तुम्हाला शिवसेना वाढवायची आहे की केवळ स्वतःचा परिवार?” असा जहरी प्रश्नही त्यांनी विचारला.

ज्येष्ठ शिवसैनिक भोजराज पाटील यांच्याशी झालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीचाही महाले यांनी उल्लेख केला. “आमदार झालात म्हणजे कोणालाही शिवीगाळ करण्याचा परवाना मिळत नाही. कार्यकर्ता लहान असो किंवा मोठा, त्याला मान-सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असलेल्या महाले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वादावरही त्यांनी पलटवार केला. “मित्रांनी वाढदिवस साजरा केला, त्याने एवढे पोटात दुखण्याचे कारण काय? कार्यक्रम सुरू असतानाच वीज कशी जाते, हा योगायोग होता का?” असा सवाल उपस्थित करून त्यांनी संशय व्यक्त केला.

“विजयराज शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेतला नसता, तर आज कोण कुठे असते?” असा राजकीय बॉम्ब टाकत महाले यांनी गायकवाडांच्या विजयामागील भाजपच्या सहकार्याची आठवण करून दिली. भाजप कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, प्रत्येक संस्थेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी जमिनीवर उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महाले यांच्या या आरोपांवर आमदार संजय गायकवाड काय उत्तर देतात, याकडे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!