spot_img
spot_img

नोकरीच्या आमिषाचा ‘२० लाखांचा सापळा’! RTO-ONGCमध्ये भरतीचे स्वप्न दाखवून मलकापुरातील कुटुंबाला गंडा? चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर (हॅलो बुलढाणा) मुलाला RTO खात्यात आणि जावयाला ONGC कंपनीत नोकरी लावण्याचे स्वप्न दाखवत एका कुटुंबाकडून तब्बल २० लाख ७४ हजार १४० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. पैसे परत मागितल्यानंतर बनावट बँक कागदपत्रे दाखवून टाळाटाळ केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध फसवणूक आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मधुबननगर परिसरातील मंदाबाई विलास झनके यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या मुश्ताक ऊर्फ सलीम हरपन्हाळे आणि त्याची पत्नी अनिता यांनी दिल्ली-मुंबईतील मंत्रालयीन अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगितले. १७ ऑगस्ट २०२२ रोजी मुश्ताक व त्याच्या साथीदारांनी मंदाबाईंचा मुलगा शुभम याला RTOमध्ये, तर जावई शरद सुरवाडे यांना ONGCमध्ये नोकरी लावण्याचे कथित आश्वासन दिले.

या आश्वासनावर विश्वास ठेवून झनके कुटुंबाने स्वतःजवळील रक्कम, बँकेचे कर्ज तसेच परिचितांकडून घेतलेले पैसे अशा विविध माध्यमांतून २४ ऑगस्ट २०२२ ते ३ मे २०२३ या काळात एकूण २० लाख ७४ हजार १४० रुपये दिल्याचे FIRमध्ये नमूद आहे.

वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने पैसे परत मागितले असता, आरोपींनी चार कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगून बँकेची कथित कागदपत्रे आणि कोरा स्वाक्षरी केलेला धनादेश दिला. मात्र बँकेत चौकशी केल्यानंतर संबंधित कागदपत्र बनावट असल्याचे समजल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून पतीची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परवानगीनंतर मलकापूर शहर पोलिसांनी मुश्ताक हरपन्हाळे, अनिता हरपन्हाळे, अमजद खान आणि डॉक्टर खान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. आरोपींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!