spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले सरकार; मुख्यमंत्री महोदय, अजून किती बळी हवेत? जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत द्या,आमदार सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर घणाघाती हल्लाबोल!

मेहकर (हॅलो बुलढाणा) पावसाने महिनाभरापेक्षा अधिक काळ दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडला असताना राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा घणाघाती आरोप आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहात. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही ठोस निर्णय घेतला जात नाही. शेतकरी मरत असताना सरकारला जाग कधी येणार?” असा थेट सवाल त्यांनी केला.

मेहकर-लोणार तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची पाहणी करताना आमदार खरात यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पावसाअभावी पिके वाळत असून विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त होत असताना शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
सरकार पॅकेजच्या घोषणा करते; मात्र शेतकऱ्याच्या हातात प्रत्यक्ष मदत कधी पोहोचणार? शेतकरी आत्महत्येच्या टोकाला पोहोचला आहे. कालही पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तरीही सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. निसर्गाची अवकृपा आणि सरकारची शेतकरीविरोधी धोरणे यामुळे बळीराजाला आत्महत्येकडे ढकलले जात आहे,” असा गंभीर आरोप आमदार खरात यांनी केला.
शेतकऱ्यांकडे विहिरीत थोडेफार पाणी असतानाही महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचन करणे कठीण झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना जगविण्यासाठी केवळ घोषणा न करता ठोस आणि शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
शासनाच्या नियमांनुसार मदत देण्याच्या घोषणा नकोत; शेतकऱ्याला किमान एकरी २५ हजार रुपये तातडीची मदत द्या. अन्यथा शेतकऱ्यांचा अंत पाहत बसण्याची सरकारची भूमिका आम्ही सहन करणार नाही, असा इशारा खरात यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध करत बळीराजासाठी विधानसभेपासून शेताच्या बांधापर्यंत संघर्ष करू,असेही आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुका संघटक श्याम निकम, गजानन निकश, पंडित बापू देशमुख, गजानन राठोड, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कृषी अधिकारी किशोर काळे, तहसीलदार निलेश मडके यांच्यासह तहसील व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!