spot_img
spot_img

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिके अक्षरशः करपण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर सोयाबीन, कपाशी, मका आणि इतर पिके कोमेजत असून, तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांनी केली आहे.

बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. विहीर, बोअरवेल किंवा धरणातील पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनाही अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिके वाचविणे कठीण झाले आहे. रात्री-अपरात्री मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना जंगली श्वापदे, साप आणि विंचूंचा जीवघेणा धोका पत्करून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करावा, नादुरुस्त डीपी तात्काळ बदलावे आणि विद्युत विभागाची रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्याशी चर्चा करून निवेदनाची गांभीर्याने दखल घेत तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

निवेदन देताना संतोष परिहार, विजय अंभोरे, निलेश देठे, अनिल बावस्कर, सुजित देशमुख, विजय जावळे, झालटे, किशोर हेलगे, गणेश ठेंग, पुरुषोत्तम कदम, रामेश्वर इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!