बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरकारी कामासाठी लाचेची मागणी झाली, तर गप्प बसून भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका! थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा, असे आवाहन बुलढाणा एसीबीने केले आहे. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संकल्पनेवर २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान जिल्ह्यात दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.
शासकीय कामकाजात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी कार्यालयांपासून गावागावांपर्यंत भ्रष्टाचारविरोधी संदेश पोहोचविला जाणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, चर्चासत्रे; सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर, हँडबिलद्वारे जनजागृती केली जाणार आहे. पथनाट्य, आकाशवाणी आणि सोशल मीडियातूनही नागरिकांना जागरूक केले जाईल.
शासकीय सेवा मिळविण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने पैसे मागितल्यास त्या मागणीला बळी पडू नका. स्वतःहून लाचेचा व्यवहार करण्याऐवजी आधी एसीबी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्या. तक्रारीसोबत उपलब्ध माहिती आणि संबंधित तपशील द्या. पडताळणीनंतर पुढील कार्यवाही विभागामार्फत केली जाईल, असे प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनाही तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि विभागाच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थी, सामाजिक संस्था व नागरिकांनी सहभागी होऊन भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूक राहणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी!
लाच मागणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवा!
तक्रारीसाठी टोल फ्री १०६४, व्हॉट्सॲप ९४०५०९१०६४ किंवा बुलढाणा कार्यालयाच्या ०७२६२-२४२५४८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.






Total Users : 3653978