धामणगाव बढे (सादिक शेख/हॅलो बुलढाणा) मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन पीडिता गर्भवती असल्याचे उघड झाल्यानंतर एका १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश समाधान तायडे (वय अंदाजे १९ वर्षे, रा. सारोळा पिर, ता. मोताळा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
इन्स्टाग्रामवर झाली ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडिता आणि आरोपी यांची इन्स्टाग्राम अकाउंटवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि फोन तसेच मेसेजद्वारे त्यांचे बोलणे सुरू होते. या ओळखीतून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून आरोपीने १० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास पीडितेच्या राहत्या घरी जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुमारे १५ दिवसांनी पुन्हा शारीरिक संबंध आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पीडितेला ताप आणि उलट्यांचा त्रास होत होता. त्रास वाढल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान पीडिता गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला वैद्यकीय तपासणीसंदर्भातील एमएलसी मेमो प्राप्त झाला. तसेच पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ६५(१), ३३३ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निखिल निर्मळ करीत आहेत.






Total Users : 3653686