बुलढाणा (हॅलो बुलढाणा) क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची हाक देताच पोलीस प्रशासनाने या आंदोलनाची धास्ती घेत आजच क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. खामगाव येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुभम राऊत यांना शेगाव ग्रामीण पोलिसांनी आज पहाटे त्यांच्या राहत्या घरातून स्थानबद्ध केले आहे.
यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान मुंबईत झालेल्या ‘झाडावर चढून’ केलेल्या आंदोलनात शुभम राऊत सहभागी झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे तुपकरांना पोलिसांची नोटीस, दुसरीकडे त्यांच्या समर्थकांची धरपकड आणि आता स्वतः रविकांत तुपकरांचाही शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न
सुरू आहेत.मात्र तूपकर भुमिगत झाले असून त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. रविकांत तुपकर कोणत्याही परिस्थितीत आंदोलनस्थळी पोहोचतीलच, असा ठाम विश्वास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस मिळाल्यानंतरही तुपकरांनी ‘२७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच’ अशी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.
▪️तूपकरांनी सरकार व पोलीसांवर डागली तोफ!
कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाल्यानंतर रविकांत तुपकरांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर तोफ डागली आहे. “शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून, अटक करून किंवा स्थानबद्ध करून या चळवळीचा आवाज दबता येणार नाही. आमच्या मागण्या रास्त आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळालेच पाहिजे. या मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर न्याय्य मागण्यांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे,” असा इशारा तुपकरांनी दिला आहे. पोलिस कारवाईचा कितीही धाक दाखवला, तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकर म्हणाले.











Total Users : 3351957