spot_img
spot_img

BIG REALITY CHECK! अमरावतीत तीन चिमुकल्यांचा आगीत बळी; बुलढाण्यात फायर फायटरचे काम अपूर्ण असतानाही कोटींची बिले अदा कशी? तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी पाहणी न करताच दिले ‘ओके’ प्रमाणपत्र? कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे कारवाईचा बडगा उगारणार का?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत तीन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बुलढाण्याची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील २१ खाटांच्या विशेष नवजात शिशू उपचार कक्षाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडून तातडीने पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या नसल्याचा प्रशासनाचा दावा असला, तरी एका दिवसाची पाहणी म्हणजे कायमस्वरूपी सुरक्षेची हमी ठरू शकते का, हा प्रश्न कायम आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास झिने आणि विद्युत पथकाने कक्षातील अर्थिंग, व्होल्टेज, विद्युत भार, वायरिंग, आपत्कालीन वीजपुरवठ्यासाठी असलेला डीजी संच आणि अग्निशमन यंत्रणेची संयुक्त तपासणी केली. रुग्णालयाकडे नगरपालिकेसह संबंधित विभागांच्या अग्निसुरक्षा परवानग्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र तपासणीतील प्रत्यक्ष रीडिंग, आढळलेल्या त्रुटी, सुचविलेल्या उपाययोजना आणि त्यांचा अनुपालन अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

नवजात कक्षामध्ये ऑक्सिजन, वार्मर, व्हेंटेंटिलेटर आणि इतर जीवनरक्षक उपकरणे चोवीस तास सुरू असतात. त्यामुळे एका सॉकेटवर अनेक उपकरणांचा भार तर नाही ना? आपत्कालीन निर्गमनमार्ग मोकळे आहेत का? धूर, उष्णता आणि ऑक्सिजन गळती शोधणारी यंत्रणा कार्यरत आहे का? शेवटची अग्निसुरक्षा ‘मॉक ड्रिल’ कधी घेण्यात आली? या प्रश्नांची लेखी आणि पुराव्यांसह उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

अमरावती दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ‘हॅलो बुलढाणा’च्या पथकाने बुलढाण्यातील राजमाता महिला रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवजात शिशू दक्षता विभागातील अत्याधुनिक उपकरणे आणि सुरू असलेल्या उपचार व्यवस्थेची माहिती पथकाला दिली. मात्र आधुनिक उपकरणांसोबत नियमित विद्युत तपासणी, प्रशिक्षित कर्मचारी आणि सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणाही तितकीच महत्त्वाची आहे.

फायर फायटरच्या कामावर गंभीर प्रश्न!

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या कार्यकाळात नागपूरच्या कंत्राटदाराला देण्यात आलेले फायर फायटरचे काम वर्क ऑर्डरनुसार पूर्ण झाले नसतानाही कोट्यवधी रुपयांची बिले अदा झाल्याचा गंभीर आरोप आहे. कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले का? प्रशासनाने वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका, देयके आणि अग्निसुरक्षा ऑडिट सार्वजनिक करून सत्य स्पष्ट करावे.

कोविड काळातील खरेदीची चौकशी होणार का?

कोविड-१९ काळात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, भांडारपाल प्रकाश बोथे तसेच काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी आवश्यक आहे. आरोग्यमंत्री या प्रकरणाची दखल घेणार का? कारण येथे प्रश्न केवळ पैशांचा नाही तर २१ चिमुकल्यांच्या श्वासांचा आहे!

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कारवाईचा बडगा उगारणार का?

अमरावतीत तीन निष्पाप चिमुकल्यांचा आगीत बळी गेल्यानंतर बुलढाण्यातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची वस्तुनिष्ठ तपासणी होणे अत्यावश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर फायटरचे काम वर्क ऑर्डरनुसार अपूर्ण असतानाही संबंधित कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी न करताच पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आपल्या पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे आता या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका, अग्निसुरक्षा ऑडिट, पूर्णत्व प्रमाणपत्र आणि अदा केलेल्या बिलांचा तपशील सार्वजनिक करून वास्तव जनतेसमोर आणावे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!