spot_img
spot_img

साड्या पाहण्यात महिला गुंग… ‘पिवळ्या साडी’ने गळ्यातील सोन्याची पोतच तोडली! बुलढाण्याच्या आठवडी बाजारात पाठलाग करून संशयित महिलेला पकडले; झडतीत सापडले तीन सोन्याचे मणी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) साड्या खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत भरदिवसा तोडल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहरात घडली. पोत तुटल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने प्रसंगावधान राखून पळणाऱ्या संशयित महिलेचा पाठलाग केला आणि तिला पकडले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत तिच्या हातामध्ये चोरीस गेलेल्या पोतमधील तीन सोन्याचे मणी आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अटकळ येथील दुर्गाबाई गजानन खोंडे या २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जाऊबाई वंदना राजू खोंडे यांच्यासोबत बुलढाण्याच्या आठवडी बाजारात साड्या खरेदी करीत होत्या. त्या दुकानात साड्या पाहत असताना त्यांच्या शेजारी पिवळी साडी परिधान केलेली एक महिला उभी होती. अचानक गळ्यातील सोन्याची पोत तुटल्यासारखे जाणवल्याने दुर्गाबाईंनी पाहणी केली. त्याचवेळी शेजारी उभी असलेली महिला समोर धावताना दिसल्याने त्यांनी तिला आवाज दिला; मात्र ती थांबली नाही.

दुर्गाबाईंनी तत्काळ तिचा पाठलाग करून तिला पकडले. पोतची पाहणी केली असता ३० मण्यांपैकी तीन सोन्याचे मणी आणि एक डोरले गायब असल्याचे आढळले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चौकशी केली असता संशयित महिलेने आपले नाव पायल रमेश चव्हाण, रा. अंत्री असे सांगितले. झडतीदरम्यान तिच्याकडे तीन सोन्याचे मणी मिळाले; मात्र डोरले मिळाले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीच्या ऐवजाची किंमत अंदाजे १० हजार रुपये आहे.

याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी अपराध क्रमांक ८१६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन जाधव करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!