spot_img
spot_img

EXCLUSIVE जिल्हा परिषद शाळेपासून राष्ट्रपती पदकापर्यंत… लोणारच्या सुपुत्राचा देशभर डंका! ACP वैभव जाधव यांच्या कर्तृत्वाला ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’!

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) जिद्द, संघर्ष आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहिल्यास सामान्य कुटुंबातील युवकही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा देशपातळीवर फडकवू शकतो, हे लोणारचे भूमिपुत्र तथा नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जगदेवराव जाधव यांनी सिद्ध करून दाखविले आहे. पोलीस दलातील उल्लेखनीय आणि अतिउत्कृष्ट सेवेसाठी त्यांना १५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे बुलढाणा जिल्ह्यासह लोणार तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

वैभव जाधव यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढे बीएस्सी, बीएडचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोणार येथील महाराणा प्रताप स्कूलमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले. मात्र, त्यांच्या मनात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न धगधगत होते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी १९९५ मध्ये एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. नाशिक येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १९९६ मध्ये मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली.

सन २००० मध्ये अमरावती येथे बदली झाल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांचा बिमोड करत कायद्याचा धाक निर्माण केला. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य त्यांनी केवळ वर्दीवर मिरविले नाही, तर आपल्या धडाकेबाज कामगिरीतून प्रत्यक्षात उतरविले. २०१४ पासून नागपूरमध्ये सेवा बजावताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करून त्यांनी पोलीस विभागाची मान उंचावली.

प्रामाणिक सेवा, कार्यतत्परता आणि कर्तव्यदक्षतेची दखल घेत त्यांना नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली. मोठ्या पदावर पोहोचूनही जन्मभूमी आणि मित्रपरिवाराशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल लोणारसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!