चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली शहरातील संभाजीनगर परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ’ असलेले चिखली पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून पकडले. पंचांसमक्ष अंगझडती घेताच त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्टल आढळून आल्याने खळबळ उडाली. ही कारवाई २३ ऑगस्टच्या रात्री १२.५० वाजताच्या सुमारास संभाजीनगरातील गोपाल किराणा दुकानासमोर करण्यात आली.
चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे हे सहकारी अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा आणि राहुल पायघन यांच्यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी रात्री गस्त घालत होते. याचदरम्यान सराईत गुन्हेगार ईश्वर धनवटे हा अग्निशस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे डीबी पथकाने शोधमोहीम सुरू केली. संभाजीनगरातील गोपाल किराणा दुकानासमोर एक व्यक्ती पायी जाताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबविले. चौकशीत त्याने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे (वय २५, रा. गौरक्षणवाडी, चिखली) असे सांगितले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला मॅगझीनसह देशी बनावटीचे पिस्टल आढळले. पिस्टलच्या काळ्या प्लास्टिक ग्रीपवर दोन्ही बाजूंना सोनेरी रंगाचे पंचकोनी स्टार असून, त्याची अंदाजित किंमत ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३, २५ अन्वये चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गवई करीत आहेत.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वातील डीबी पथकाने ही धडक कारवाई केली.












Total Users : 3329588