spot_img
spot_img

आरेगाव रोडवर ‘भिंगरी संत्रा’चा गुप्त प्रवास फेल! गणपती मंदिरासमोर डोणगाव पोलिसांचा सापळा; २४० बाटल्यांसह दुचाकीस्वार जेरबंद, ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) दुचाकीवरून देशी दारूचा साठा घेऊन आरेगाव रोडने निघालेल्या एका व्यक्तीचा ‘गुप्त प्रवास’ डोणगाव पोलिसांनी अवघ्या काही क्षणांत रोखला! गणपती मंदिरासमोर सापळा रचून पोलिसांनी दुचाकीस्वाराला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून देशी दारूच्या तब्बल २४० सीलबंद बाटल्या आणि होंडा शाइन दुचाकी असा एकूण ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धडक कारवाई आज, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डोणगाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या आदेशावरून पीएसआय विजय अजमिरे, पोलीस कॉन्स्टेबल पवन गाभणे आणि हर्ष सहगल हे खासगी वाहनातून परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्याचवेळी आरेगाव रोडवरून एक व्यक्ती दुचाकीवर विक्रीच्या उद्देशाने देशी दारू घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरेगाव रोडवरील गणपती मंदिरासमोर सापळा रचला. संशयित होंडा शाइन दुचाकी क्रमांक एमएच ३७ एके ६९९१ दिसताच ती अडविण्यात आली. दुचाकीस्वाराने आपले नाव गणेश मारुती पुरी (वय ३५, रा. बायखेडा, ता. रिसोड, जि. वाशिम) असल्याचे सांगितले.

झडतीदरम्यान दुचाकीवरून १८० मिलीच्या ‘देशी भिंगरी संत्रा’ कंपनीच्या तब्बल २४० सीलबंद बाटल्या आढळल्या. पोलिसांनी १९ हजार २०० रुपयांची दारू आणि ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली.

याप्रकरणी गणेश पुरीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पीएसआय विजय अजमिरे करीत आहेत. या कारवाईने परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!