बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आजच्या स्पर्धात्मक आणि चिखलफेकीच्या राजकारणात विरोधकाबद्दल आदर बाळगण्याची अपेक्षा भाबडेपणा ठरू शकतो.
असा आदर राखणारे नेते विरळच पाहायला मिळतात. मात्र, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार डी. एस. लहाने यांनी आपल्या राजकीय सुसंस्कृतपणाचा आणि मोठ्या मनाचा परिचय दिला आहे. राजकीय गणितांच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या सख्या विरोधकाला दिलेले मत सध्या चर्चेत आहे.
बुलढाणा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेकडून प्रा. डी. एस. लहाने आणि शिक्षक संघटनेकडून सुरेश देवकर हे दोन प्रमुख उमेदवार आमनेसामने होते. दोघेही बुलढाण्याचे आणि एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले. लहाने यांनी संपूर्ण प्रचारादरम्यान चकार शब्दानेही देवकरांवर किंवा इतर कुठल्याही विरोधकावर टीका केली नाही. विरोधासाठी विरोध ही राजकारणाची जुनी पद्धत बाजूला सारत त्यांनी संयम बाळगला.
विशेष म्हणजे, जेव्हा स्वतः उमेदवार म्हणून मतदान करण्याची वेळ आली, तेव्हा आपले दुसरे मत चक्क प्रतिस्पर्धी सुरेश देवकर यांनाच दिले. एरवी राजकीय समीकरणांमध्ये विरोधकाचे मत जितके कमी होईल, तितका आपला फायदा मानला जातो; परंतु या सर्व गणितांना फाट्यावर मारत या सरळ स्वभावाच्या माणसाने दाखवलेला मोठेपणा खरोखरच “मोठ्ठा” आहे.विरोधक हा शत्रू नसून केवळ निवडणुकीतील प्रतिस्पर्धी असतो, हा विचार सरांनी कृतीतून दाखवून दिला.काल पत्रकारांशी बोलताना सहज हे गुपित उलगडले गेले.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना डी. एस. लहाने यांनी हा किस्सा अगदी बेमालूमपणे सहजपणे बोलून दाखवला.निवडणुका संपतात, राजकीय मतभेद मात्र विसरले जात नाही.ते वर्षानुवर्षे चालतात, कधी खुन्नसही धरली जाते पण अशा प्रकारचा दिलदारपणा आणि सुसंस्कृतपणा राजकारणात दुर्मिळ आहे.अश्यावेळी लहाने यांचा मोठ्ठेपणा आदर्शवत तर ठरतोच पण खुप काही शिकवूनही जातो.





Total Users : 3662660