spot_img
spot_img

BIG BREAKING! 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणून सन्मान… आज रेतीमाफियांच्या निशाण्यावर! अंढेरा फाट्यावर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या गाडीला टिप्परने धडक देत जिवे मारण्याचा प्रयत्न; ब्रिझा आडवी लावली अन् ४ ब्रास रेतीसह विनानंबर टिप्पर पळवला! पुरस्कारप्राप्त महिला अधिकाऱ्यावर हा ‘खतरनाक हल्ला’ करण्याची हिंमत कुणाच्या बळावर?

अंढेरा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या देऊळगाव राजा येथील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि त्यांच्या पथकावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना अंढेरा फाट्यावर आज, १९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची मजल थेट तहसीलदार आणि त्यांच्या पथकाला वाहनाने चिरडण्याचा कथित प्रयत्न करण्यापर्यंत गेल्याने महसूल व पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ या आपल्या पथकासह अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करीत होत्या. सकाळी ६.४५ ते ७.०४ वाजेदरम्यान अंढेरा फाट्यावर पांढऱ्या रंगाचे, क्रमांक नसलेले टिप्पर सुमारे चार ब्रास अवैध रेतीची वाहतूक करताना आढळले. या रेतीची किंमत अंदाजे ८० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पथक कारवाई करीत असतानाच आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. एवढ्यावरच न थांबता तहसीलदार आणि त्यांच्या पथकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाहनाला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर खासगी ब्रिझा कार आडवी लावून रेतीने भरलेले टिप्पर घटनास्थळावरून पळवून नेण्यास मदत करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी हर्षल मनोहर अंभोरे (रा. एकलारा, ता. चिखली) आणि एका अज्ञात आरोपीविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. बीएनएसच्या कलम १०९(१), १३२, ३०३(२), १२६(२), ४५, ३(५), तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४८(७) व ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

घटनास्थळी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि सहायक पोलीस निरीक्षक सविता कुवारे यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि सविता कुवारे करीत आहेत. आरोपींचा शोध आणि टिप्परचा माग काढण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

विशेष म्हणजे, देऊळगाव राजा येथील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या कर्तव्यदक्ष आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची दखल घेत बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते त्यांना नुकताच ‘उत्कृष्ट तहसीलदार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अवैध रेती वाहतुकीविरोधात निर्भीडपणे कारवाई करणाऱ्या याच महिला तहसीलदारांना आता कथित रेतीमाफियांनी वाहनाने धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यावर भररस्त्यात झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे रेतीमाफियांची वाढलेली हिंमत आणि प्रशासनाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!