बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहरासह तालुक्यातील काही गावांची तहान भागविणाऱ्या येळगाव धरणाबाबत अत्यंत गंभीर आणि नागरिकांच्या आरोग्याला हादरा देणारी बाब समोर आली आहे. परिसरातील नालीचे घाण व दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट धरणाच्या पाण्यात मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘हॅलो बुलढाणा’च्या एका जागृत वाचकाने निदर्शनास आणून दिला आहे. हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये संतापासोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येळगाव धरणातून बुलढाणा शहर आणि परिसरातील काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. असंख्य नागरिक हे पाणी दररोज पिण्यासह घरगुती वापरासाठी वापरतात. अशा महत्त्वाच्या जलस्रोतामध्ये नालीचे सांडपाणी खरोखरच मिसळत असेल, तर हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर खेळ ठरू शकतो.
सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे ही घाणेरडी धार नेमकी किती दिवसांपासून धरणात मिसळत आहे? संबंधित यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी नियमित पाहणी करतात की नाही? पाणी शुद्धीकरणापूर्वी आणि त्यानंतर आवश्यक प्रयोगशाळीय तपासणी केली जाते का? आतापर्यंत हा प्रकार कोणाच्याही लक्षात कसा आला नाही? असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
‘हॅलो बुलढाणा’ या प्रकरणाची स्वतंत्र अधिकृत पुष्टी करत नसले, तरी वाचकाने निदर्शनास आणलेल्या गंभीर बाबीची प्रशासनाने तातडीने स्थळपाहणी करणे आवश्यक आहे. सांडपाण्याचा प्रवाह त्वरित रोखून धरणातील तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासावेत. त्याचा अहवाल सार्वजनिक करावा आणि दोषींची जबाबदारी निश्चित करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.















Total Users : 3312955