spot_img
spot_img

CRIME NEWS! चिखली बसस्थानकावर वृद्धाच्या गळ्याला लावला ‘हात’ अन् सोन्याच्या ‘ओम’सह झाला गायब… पण बीडच्या चौकात खाकीने खांद्यावर हात ठेवताच खिशातून निघाला पावणेदोन लाखांचा ‘पुरावा’!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली बसस्थानकावरील गर्दीत ८० वर्षीय शेतकऱ्याच्या गळ्यातील सोन्याचा ‘ओम’ असलेला पावणेदोन लाखांचा गोफ तोडून पसार झालेल्या संशयिताला चिखली डीबी पथकाने थेट बीडमध्ये जाऊन शिताफीने जेरबंद केले. संशयिताच्या अंगझडतीत चोरीला गेलेला तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा संपूर्ण सोन्याचा गोफ मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

उदयनगर येथील रामकृष्ण गणपतराव उपाध्ये (वय ८०) हे ६ ऑगस्ट रोजी मित्र गजानन दगडू दुधाळे यांच्यासोबत चिखलीत आले होते. काम आटोपून गावाकडे परतण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील १३ ते १४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ ‘ओम’सह लंपास करण्यात आला. याप्रकरणी चिखली पोलिसांनी अपराध क्रमांक ६७९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान संशयित बीड जिल्ह्यातील असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळाली. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी पथकाने बीड गाठले. गांधीनगर परिसरात शोध घेतल्यानंतर संशयित अण्णाभाऊ साठे चौकात असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून लक्ष्मण रामदास जावध याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, तो चोरीचा गोफ विकण्यासाठी जात होता. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याजवळ चोरीचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सावळे, अजय इटावा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल ललिता खरात आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले यांनी सहभाग घेतला. पुढील तपास अमोल गवई आणि अजय इटावा करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!