spot_img
spot_img

मध्यरात्री मलकापूर बसस्थानकात अचानक झाला ‘खळ्ळऽऽ खटाक’ आवाज! पहाटे पाहिलं तर पाच एसटी बसेसच्या काचा गायब; अंधारात कुणी काढला लालपरीवर राग?

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) मध्यरात्रीची निरव शांतता… बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसेस आणि अचानक झालेला काचा फुटण्याचा खळखळाट! मलकापूर शहरातील बसस्थानकात अज्ञात व्यक्तीने तब्बल पाच एसटी बसेसच्या काचा फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तोडफोडीमुळे एसटी महामंडळाच्या मालमत्तेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात व्यक्तीने बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या पाच बसेसना एकामागून एक लक्ष्य केले. बसेसच्या काचा फोडून संशयिताने घटनास्थळावरून पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला? आरोपीने एसटी बसेसवरच राग का काढला? की या तोडफोडीमागे आणखी काही वेगळे कारण दडले आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काचा फुटल्याने संबंधित बसेस सेवेतून तात्पुरत्या बाहेर ठेवाव्या लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीच्या नियोजित फेऱ्यांवर परिणाम होऊन प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. बसस्थानकासारख्या सार्वजनिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी एक व्यक्ती बिनधास्तपणे पाच बसेसची तोडफोड करून निघून जाते, तर रात्रीची सुरक्षा व्यवस्था नेमकी होती कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, तपास सुरू आहे. आता बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत संशयित कैद झाला आहे का आणि या ‘मध्यरात्रीच्या तोडफोडी’मागील चेहरा कधी समोर येणार, याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!