बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ऊन, वारा, पाऊस आणि थकव्याला न जुमानता खांद्यावर पवित्र कावड घेत तब्बल 351 किलोमीटरचा भक्तीमय महाप्रवास पूर्ण करणारे बुलढाण्यातील महाकाल भक्त आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. जय श्री महाकाल ग्रुप, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित सहाव्या वर्षातील भव्य कावड यात्रा उद्या सोमवारी, 17 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा शहरात दाखल होणार असून, संपूर्ण शहर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे.
श्रावण महिन्यात दरवर्षी हटके आणि भव्य धार्मिक उपक्रम राबविणाऱ्या जय श्री महाकाल ग्रुपने यंदा थेट त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीतून कावड आणण्याचा संकल्प केला. 24 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता बुलढाण्यातील कारंजा चौकातून ही कावड यात्रा त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली होती. त्यानंतर शिवभक्तांनी खडतर परिस्थितीतही न थांबता 351 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.
आता सोमवारी या पवित्र कावडीचे बुलढाण्यात आगमन होताच धाड नाका परिसरातून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे, शिवभक्तांचा जल्लोष आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी शहरातील वातावरण अक्षरशः शिवमय होणार आहे. मिरवणूक कारंजा चौकमार्गे पोलीस मुख्यालयाजवळील महाकाल मंदिरात पोहोचून समाप्त होणार आहे.
या भव्य यात्रेच्या यशस्वितेसाठी जय श्री महाकाल ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी बुलढाणेकरांसाठी हा केवळ कावड सोहळा नसून श्रद्धा, शक्ती आणि शिवभक्तीचा विराट उत्सव ठरणार आहे.
तयार राहा बुलढाणेकरांनो… 351 KMचा भक्तीचा प्रवास आता शहराच्या उंबरठ्यावर आहे! सोमवारी ‘हर हर महादेव’चा महागजर आसमंत दणाणून सोडणार!















Total Users : 3298982