जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे सचिन बागुल यांची अखेर जळगाव जामोद पोलीस निरीक्षकपदी नियमित नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, बागुल यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवत त्यांच्याकडे जळगाव जामोदची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना सचिन बागुल यांनी अवैध धंदे, जुगार अड्डे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात सातत्याने कारवाईचा बडगा उगारला. फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासोबतच मंदिर चोरीसारख्या जुन्या आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावून त्यांनी पोलिसांची पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले.
नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने ऐकून घेणे, सर्वसामान्यांना न्याय देण्यास प्राधान्य आणि गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका, ही बागुल यांची ओळख ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वातील कारवायांमुळे गुन्हेगारी वर्तुळात धडकी भरली, तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
बागुल यांच्या नियुक्तीचे व्यापारी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून स्वागत होत असून, आता जळगाव जामोदमध्ये कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










Total Users : 2722531