spot_img
spot_img

BIG BREAKING | MPSC पेपरफुटीचा ‘सिंदखेडराजा कनेक्शन’! शेलू गावचा विजय किंगर गजाआड; बुलढाण्यापर्यंत पोहोचले पेपरफुटीच्या रॅकेटचे धागेदोरे!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने आता अक्षरशः मोठा भूकंप घडवला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात या प्रकरणाचे धागेदोरे सांगली, बुलढाणा आणि नवी मुंबईपर्यंत पोहोचले असून आणखी दोन उमेदवार आणि दोन मध्यस्थांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या थेट ११ वर पोहोचली आहे.

सर्वात मोठी बाब म्हणजे अटक झालेल्या उमेदवारांमध्ये विजय किंगर याचा समावेश असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेलू, ता. सिंदखेडराजा येथील असल्याची स्थानिक माहिती समोर आली आहे .आणि त्याला तेथून अटकही करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार विजय किंगर हा बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवार असून दुसरा उमेदवार साजिद संदे हा सांगली येथील आहे. या दोघांनी प्रश्नसंच बेकायदेशीरपणे मिळवल्याचा पोलिसांचा आरोप आहे

या दोघांना प्रश्नसंच मिळवून देण्यात कथित भूमिका असलेल्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोन मध्यस्थांना नवी मुंबईतून पकडण्यात आले. गुन्हे शाखेच्या तपासानुसार, एमपीएससीच्या गोपनीय कक्षातून तज्ज्ञांनी निवडलेल्या प्रश्नसंचाच्या प्रती तयार करून त्या आर्थिक फायद्यासाठी बाहेर काढण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणात यापूर्वी एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे यांच्यासह इतर आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे विजय किंगरचे नाव औषध निरीक्षक पदासाठी प्रसिद्ध झालेल्या पात्र उमेदवारांच्या यादीतही आहे.
या प्रकरणाचा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी यापूर्वी प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला होता आणि चौकशीची मागणी केली होती. मात्र हे राजकीय आरोप असून त्यांची अंतिम सत्यता तपास व न्यायालयीन प्रक्रियेतूनच निश्चित होणार आहे.

दरम्यान, प्रारंभी एका उमेदवारापुरते प्रकरण मर्यादित असल्याचे चित्र होते; मात्र त्यानंतर झालेल्या अटकसत्रामुळे तपासाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. ऋतुजा पाटीलसह अन्य उमेदवारांपर्यंतही प्रश्नसंच पोहोचल्याचा पोलिसांचा दावा आहे.
किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? त्यासाठी किती पैशांची देवाणघेवाण झाली? आणि या साखळीच्या मुळाशी आणखी कोण कोण आहे? याचा तपास पोलीस करत आहे

मुंबई गुन्हे शाखेचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे MPSC पेपरफुटीचे नवे थर उलगडत आहेत. आता बुलढाण्यातील शेलू गावापर्यंत या प्रकरणाचा धागा पोहोचल्याने जिल्ह्यातही मोठी खळबळ उडाली आहे!

सिंदखेडराजा पोलिसांची महत्त्वाची साथ!

मुंबई SIT आणि मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी सिंदखेडराजात दाखल झाल्यानंतर, बुलढाणा जिल्ह्याचे एस.पी. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष इंगळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने तपास पथकाला आवश्यक ते सहकार्य व मदत केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!