बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कोरड्या दुष्काळाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत बुलढाण्यात आज शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उसळला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. “नुसता दुष्काळ जाहीर नको; हेक्टरी १ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा!” अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, मका आणि ज्वारीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. हातात नुकसानग्रस्त सोयाबीन, ज्वारी, मका आणि कापूस घेऊन शेतकऱ्यांनी आपली व्यथा प्रशासनासमोर मांडली.
आंदोलनादरम्यान कोरड्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णयाची प्रत फाडून निषेध नोंदवण्यात आला. “कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटणार नाही. प्रत्यक्ष मदत खात्यात आली पाहिजे,” अशी भूमिका तुपकर यांनी मांडली.
आंदोलन अधिक तीव्र होत असताना पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यानंतरही आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरूच होती.
एकीकडे निसर्गाच्या फटक्याने शेतकरी संकटात, तर दुसरीकडे मदतीच्या प्रश्नावर सरकारविरोधात रोष अशी स्थिती आज बुलढाण्यात पाहायला मिळाली.हेक्टरी १ लाख रुपयांच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3525301