खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरातील संतविहार कॉलनीत मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या दोन तडीपार संशयितांना शिवाजी नगर पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्री गजानन महाराज मंदिराजवळ २९ जुलै रोजी रात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पथक रात्री गस्तीवर असताना मंदिराजवळील लोकवस्तीमधील पडसावलीत दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून उभे असल्याचे दिसले. पोलीस पथक चौकशीसाठी जवळ जाताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत दोघांनाही ताब्यात घेतले.
अभिषेक भिमराव हेलोडे आणि मंगेश छगण जाधव अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. एवढ्या रात्री लोकवस्तीमध्ये थांबण्याचे समाधानकारक कारण दोघांनाही सांगता आले नसल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांविरुद्ध यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. तसेच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने दोघांना बुलढाणा, वाशिम, जालना, जळगाव खान्देश आणि अकोला जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.
सक्षम अधिकाऱ्याची कोणतीही परवानगी नसताना त्यांनी खामगाव शहरात प्रवेश करून तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ (ब) आणि १४१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.










Total Users : 2722547