spot_img
spot_img

शाळा सुटतेय… पण घरी जाण्यास बसच नाही! जळगाव जामोद–वरवट मार्गावरील विद्यार्थ्यांचा संताप; अक्षय पाटील आक्रमक!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) शिक्षणासाठी दररोज जळगाव जामोद शहरात येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची एसटी बसअभावी अक्षरशः फरफट सुरू आहे. वरवट बकाल, संग्रामपूर, निवाणा, चांगेफळ, खेर्डा बु., खेर्डा खु. तसेच परिसरातील गावांमधून विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांसाठी शहरात येतात; मात्र त्यांच्या संख्येच्या तुलनेत बस फेऱ्या अत्यंत अपुऱ्या ठरत आहेत.

विशेषतः खेर्डा बु. हे मोठे गाव असून लगतच्या अनेक गावांतील विद्यार्थीही याच बसस्थानकावर जमा होतात. शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान खेर्डा मार्गे वरवटकडे जाणाऱ्या बस कमी असल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून गर्दीतून प्रवास करावा लागत असल्याची गंभीर परिस्थिती आहे.

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तातडीने बस फेऱ्या वाढवा, अशी मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी केली.

अक्षय पाटील व पालकांनी आगार प्रमुख मुकुंद नावकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिवदास खिरोडकार, अनिलसिंह राजपूत, अजय गिरी, जितेंद्र चाहेल, वैभव जाणे, आकाश आटोळे, अमोल बहादरे, संतोष गणगे, सागर गवई, गजानन व्यवहारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!