बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील अत्यंत महत्त्वाचे आणि कायम वर्दळीचे असलेले तहसील चौक, एडेड शाळा रोड, भारत शाळा रोड, जिजामाता महाविद्यालय, रुखाई कन्या शाळा, बाल शिवाजी कॉन्व्हेंट ते सर्क्युलर रोड हे मार्ग सध्या वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा बेशिस्तपणे उभी करण्यात येणारी वाहने आणि वाहतूक नियोजनाचा पूर्णपणे उडालेला बोजवारा यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना आहेत. मात्र अनेक आस्थापनांकडे स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहकांची दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते चक्क पार्किंग झोन बनले आहेत.
विशेषतः शाळा सुटण्याची आणि शासकीय कार्यालये बंद होण्याची वेळ जवळपास एकच असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. स्कूल बस, ऑटो, पालकांची वाहने, दुचाकी आणि चारचाकींच्या गर्दीमुळे काही मिनिटांतच वाहतूक ठप्प होते. विद्यार्थ्यांना आणि पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.
या कोंडीत एखादी रुग्णवाहिका अथवा अग्निशमन वाहन अडकल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? वाहतूक पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता नो-पार्किंग कारवाई, नियमित बंदोबस्त आणि पर्यायी पार्किंग व्यवस्था तातडीने करावी. प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.












