spot_img
spot_img

कर्जमाफीच्या यादीत ‘आकड्यांचा खेळ’! बँकेत दीड लाख कर्ज, सरकारच्या यादीत फक्त ७० हजार; शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा, अन्यथा महाराष्ट्र पेटेल – रविकांत तुपकरांचा सरकारला अल्टिमेटम!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणावर तफावत समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमासह तीव्र संताप निर्माण झाला आहे. बँकेच्या नोंदीत थकीत कर्जाची रक्कम वेगळी, तर शासनाच्या कर्जमाफी यादीत दाखविलेली रक्कम वेगळी असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.

एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर बँकेत दीड लाख रुपयांचे थकीत कर्ज असताना शासनाच्या यादीत केवळ ७० हजार रुपये दाखविले जात आहेत. उर्वरित रक्कम रोखीने भरण्यासाठी बँक अधिकारी शेतकऱ्यांवर दबाव आणत असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून उर्वरित रक्कम OTS अंतर्गत बँकांनी राईट ऑफ करावी, असे सांगितले जात असले तरी शासनाने याबाबत अधिकृत आदेश किंवा स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

“OTS अंतर्गत कर्ज राईट ऑफ झाल्यास शेतकऱ्यांचा सिबिल खराब होणार नाही का? भविष्यात शिक्षण, गृह किंवा नवीन पीककर्ज घेताना त्याचा फटका बसल्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल तुपकर यांनी उपस्थित केला.

सरकारने दिलेला शब्द पाळून ₹२ लाखांपर्यंतचे मुद्दल आणि व्याज विनाअट सरसकट माफ करावे, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹२ लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे तसेच पुनर्गठित व वंचित शेतकऱ्यांनाही योजनेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. कर्जमाफीच्या नावाखाली हातचालाखी झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा गंभीर इशाराही तुपकर यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!