बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय दिग्गजांची बिनविरोध विजयी घोडदौड सुरूच असून, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था मतदारसंघातून तीन अर्ज दाखल झाले होते. मात्र प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव आणि दत्तात्रय शेळके यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने जाधव यांच्या विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार आणि मेहकर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रतापराव जाधवांनी यापूर्वी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे उपाध्यक्षपदही सांभाळले आहे. त्यामुळे त्यांच्या बँकेतील पुनरागमनाकडे सहकार क्षेत्रात मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
विशेष म्हणजे, काल दत्तात्रय देशमुख यांनी माघार घेतल्याने माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बिनविरोध झाले; तर आज दत्तात्रय शेळके यांच्या माघारीमुळे प्रतापराव जाधव यांचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात सध्या एकच मिश्कील चर्चा रंगली आहे-शिंगणे आणि जाधव या दोन्ही दिग्गजांना अखेर ‘दत्त’ पावला!












