देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) सिंनगाव जहाँगिर फाटा ते खल्याळ गव्हाण या जवळपास २० किलोमीटरच्या रस्त्यालगत असलेल्या १५ ते २० वर्षे जुन्या हिरव्यागार शासकीय झाडांची बेसुमार कत्तल झाल्याचा गंभीर आरोप युवानेते योगेश मिसाळ यांनी केला आहे. वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता महावितरणचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तब्बल २०० ते २५० झाडे तोडून लाकूड व्यापाऱ्यांना विकल्याचा दावा त्यांनी केला.
सुरुवातीला विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अनेक डेरेदार झाडे मुळापासून कापण्यात आल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे. कोणताही अधिकृत पंचनामा, परवानगी अथवा लिलाव नसताना लाखो रुपयांच्या शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि लाकडांची वाहतूक सुरू असताना वनविभाग व महावितरणचे अधिकारी अनभिज्ञ होते की या प्रकरणात कुणाचे संगनमत आहे, असा संतप्त सवालही मिसाळ यांनी उपस्थित केला.
संबंधित ठेकेदार, लाकूड व्यापारी आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा योगेश मिसाळ यांनी दिला आहे.












