मेहकर (हॅलो बुलढाणा) अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज बुलढाणा शहरात होणाऱ्या विराट मोर्चाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात तब्बल २०० गाड्यांच्या भव्य ताफ्यासह बुलढाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे, मेहकरच्या राजकारणातील ‘ढाण्या वाघा’ची एन्ट्री आलिशान डिफेंडरमधून झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. “जयभीम, जय संविधान”च्या घोषणांनी मेहकर परिसर दणाणून गेला असून, निळे झेंडे आणि वाहनांचा लांबच लांब ताफा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बुलढाणा जिल्ह्याची अभेद्य एकजूट मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला दाखविण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
बुलढाणा शहरात आज “ना भूतो, ना भविष्यती” असा ऐतिहासिक जनसागर उसळणार असल्याची जोरदार चर्चा जिल्हाभर सुरू आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात मेहकरमधून निघालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे मोर्चाला नवी धार मिळाली असून, आता सरकार या जनआक्रोशाची दखल घेणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.












