spot_img
spot_img

दुधलगाव–मोरखेडसह दहा गावांना शुद्ध पाणी द्या! भर पावसात पाण्याच्या टाकीवर चढून युवासेनेचे पाच तास ठिय्या! लेखी आश्वासनानंतरच माघार, अन्यथा आठ दिवसांनी आत्मदहनाचा इशारा!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/एस. बि. शेख) मोताळा आणि मलकापुर तालुक्यातील मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना होत असलेला दूषित पाणीपुरवठा तातडीने बंद करून शुद्ध पिण्याचे पाणी द्यावे, या प्रमुख मागणीसाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, माजी युवासेना तालुका प्रमुख गणेश सुशिर यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात पाण्याच्या टाकीवर चढून तब्बल पाच तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता पाहून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मलकापूर तालुक्यातील मोरखेड, दुधलगाव, लोणवडी, खामखेड, गौलखेड, आळंद, हरणखेड तसेच मोताळा तालुक्यातील न्हावी, दाभाळी आणि माकोडी या दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या गावांमध्ये दूषित व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त झालेल्या युवासेनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे व माजी युवासेना तालुकाप्रमुख गणेश सुशिर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भर पावसात पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन सुरू केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. “साहेब पिता आर.ओ.चं पाणी… आम्हाला मात्र सांडपाणी”, “शुद्ध पाणी हा आमचा हक्क आहे” “बंद करा बंद करा जिवाशी खेळणं बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी सौ. माने यांनी घटनास्थळी येत आंदोलकांशी चर्चा केली. पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासून तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शुभम घोंगटे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी सौ. माने यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “दिलेले लेखी आश्वासन आठ दिवसांत पूर्ण झाले नाही, तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.” या इशाऱ्यामुळे प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, यापुढे केवळ आश्वासनांवर समाधान मानले जाणार नाही, अशी ठाम भूमिका शुभम घोंगटे यांनी मांडली. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. या आंदोलनात युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, माजी तालुकाप्रमुख गणेश सुशिर, जगदीश पाटील, विलास पाटील, चेतन पाटील, गणेश दीक्षित, कृष्णा पाटील, गौरव ठोसर, ईश्वर झनके, लक्ष्मण भिस्ते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर व अजय सावळे यांनी मध्यस्थी करून प्रशासनाशी समन्वय साधत आंदोलनाची सकारात्मक सांगता घडवून आणली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!