चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली-जालना मार्गावरील मेरा चौकी परिसरात दोन दुचाक्यांची समोरासमोर भीषण धडक होऊन अवघ्या १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दुसरा दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सायंकाळी सुमारे ४ वाजेच्या सुमारास चिखली-जालना रोडवरील मेरा चौकी परिसरात दोन दुचाक्या समोरासमोर धडकल्या. धडक इतकी भीषण होती की अंत्री खेडेकर, ता. चिखली येथील रोहन कैलास मोळकर (वय १७) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमी दुचाकी चालकाला उपचारासाठी चिखलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रोहनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
अवघ्या १७ व्या वर्षी रोहनचा असा अचानक मृत्यू झाल्याने अंत्री खेडेकर परिसरावर शोककळा पसरली आहे. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अंढेरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.












