बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजूर घाटातील बालाजी मंदिर परिसरात मंगळवारी, 28 जुलै रोजी दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघात एवढा गंभीर होता की जखमी नागरिक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला वेदनेने तडफडत पडले होते. मात्र याच संकटाच्या क्षणी लोकप्रतिनिधीतील माणुसकीचा चेहरा समोर आला.
घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जखमींच्या डोक्याला, हात-पायाला झालेल्या जखमांमधून रक्तस्राव सुरू असल्याचे पाहून त्यांनी स्वतःचा रुमाल बांधून रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतःच्या तसेच उपलब्ध वाहनांतून जखमींना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली.
जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांच्याशीही त्यांनी तातडीने संपर्क साधून जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
या अपघातात साखळी बु. येथील शांताराम सोनुने तसेच थड परिसरातील अमोल निंबाळकर, अजय कुसळकर आणि परमेश्वर कुसळकर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
संकटात भाषण नाही, फोटोसेशन नाही… आधी जखमींचा जीव! संजूभाऊ, म्हणूनच तुम्ही ‘भाऊ’च…! लोकप्रतिनिधीपदापलीकडची ही संवेदनशीलता आज राजूर घाटाने अनुभवली.












