चिखली (हॅलो बुलढाणा) शहरातील जालना रोडवर बुलढाणा अर्बन बँकेच्या सहायक व्यवस्थापकावर तीन अनोळखी हल्लेखोरांनी लोखंडी गजाने अत्यंत क्रूर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महेश लहु जगदाळे (वय ३१, रा. पुंडलिक नगर, चिखली) यांच्या दोन्ही हातांना व दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
महेश जगदाळे हे मागील वर्षभरापासून बुलढाणा अर्बनच्या चिखली शाखेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. २५ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ते मोटारसायकलने जिमकडे जात होते. पुंडलिक नगरच्या कमानीजवळ उतार असल्याने त्यांनी वाहनाचा वेग कमी केला. त्याचवेळी रस्त्यावर नंबर प्लेट नसलेली ग्रे रंगाची स्विफ्ट डिझायर कार उभी होती.
कारमधून लोखंडी गज घेऊन उतरलेल्या एका व्यक्तीने अचानक त्यांच्या डाव्या हातावर प्रहार केला. महेश रस्त्यावर कोसळताच दुसरा व्यक्तीही कारमधून उतरला. त्यानंतर हल्लेखोराने त्यांच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर गजाने वार करून गंभीर जखमी केले. तिसरा व्यक्ती चालकाच्या सीटवर बसलेला होता. हल्ल्यानंतर तिघेही मेहकर फाट्याच्या दिशेने फरार झाल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी महेश यांना चिखलीतील रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारामुळे तक्रार देण्यास विलंब झाल्याचे त्यांच्या आई सुनिता जगदाळे यांनी सांगितले. चिखली पोलिसांनी अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली असून, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.















Total Users : 3299903