चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) युवकांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून निरोगी आणि जबाबदार पिढी घडविण्यासाठी बुलढाणा पोलीस दलाने जनजागृतीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन परिवर्तन’ उपक्रमांतर्गत चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पहाटे चिखलीच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी धावताना दिसल्याने नागरिकांमध्ये क्षणभर कुतूहल निर्माण झाले. मात्र, ही धाव कोणत्याही कारवाईसाठी नसून नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी असल्याचे समोर येताच नागरिकांनीही उपक्रमाचे स्वागत केले. विशेष म्हणजे, स्वतः पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्पर्धेत धावत सहभाग घेत युवकांचा उत्साह वाढविला.
यावेळी मार्गदर्शन करताना तांबे म्हणाले की, नशेमुळे व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण, करिअर, कुटुंब आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होते. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून खेळ, व्यायाम, योग, वाचन आणि समाजोपयोगी कार्यांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. “नशामुक्त युवक–सुरक्षित समाज” हा संदेशही त्यांनी दिला.
स्पर्धेत गुड मॉर्निंग ग्रुप, फीट ग्रुप, स्वप्नपूर्ती अकॅडमी, एनसीसी विद्यार्थी, पत्रकार, युवक आणि प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले. ‘मिशन परिवर्तन’ची ही धाव पोलीस आणि समाजातील विश्वास अधिक मजबूत करणारी ठरली.












