जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) गुन्हेगार कितीही चलाख असला, तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही, हे जळगाव जामोद पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पिंपळगाव काळे येथील बिरोबा मंदिरातून तब्बल तीन वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या चांदीच्या मुकुटाचा छडा लावत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीच्या ताब्यातून १८० ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे ₹३६ हजार किमतीचा चांदीचा मुकुट जप्त करण्यात आला आहे.
सन २०२३ मध्ये बिरोबा मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीला गेल्यानंतर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२३, कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा तीन वर्षांपासून पोलिसांसमोर आव्हान बनून उभा होता.
दरम्यान, अन्य एका मंदिर चोरीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या तपासाच्या फेऱ्यात आरोपीने अखेर बिरोबा मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्यानंतर चोरीचा चांदीचा मुकुट हस्तगत करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन बागुल आणि तपासी अधिकारी अमोल पंडित यांनी ही दमदार कारवाई केली. जुन्या गुन्ह्याची पाळेमुळे खोदून मुद्देमाल परत मिळवणाऱ्या जळगाव जामोद पोलिसांच्या तपासकौशल्याचे नागरिकांमधून जोरदार कौतुक होत आहे.












