जानेफळ (हॅलो बुलढाणा) साधे पेट्रोल उपलब्ध असतानाही ते संपल्याचे सांगून ग्राहकांना महागडे ‘पावर’ पेट्रोल घेण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर प्रकार जानेफळ येथील ‘श्री भालचंद्रेश्वर पेट्रोलियम’ (HPCL) या पेट्रोल पंपावर समोर आला आहे. पंप व्यवस्थापनाच्या या कथित मनमानीमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या अधिकृत साठा फलकानुसार, संबंधित पंपावर तब्बल १० हजार ८७२ लिटर साधे पेट्रोल उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ग्राहकांनी साध्या पेट्रोलची मागणी केल्यानंतर “साधे पेट्रोल संपले आहे, पेट्रोल हवे असेल तर पावर पेट्रोलच घ्यावे लागेल,” असे सांगून साधे पेट्रोल देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे.
साध्या पेट्रोलचा दर प्रतिलिटर ₹११२.३७, तर पावर पेट्रोलचा दर ₹१२२.०९ आहे. त्यामुळे प्रत्येक लिटरमागे ग्राहकांना तब्बल ₹९.७२ जास्त मोजावे लागत आहेत. दहा लिटर पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकाच्या खिशातून जवळपास ₹९७ अधिक काढले जात आहेत.
साठा उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई दाखवून महागडे पेट्रोल विकण्याचा हा प्रकार ग्राहकांची उघड आर्थिक लूट नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पंपाच्या नफ्यासाठी सर्वसामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड का सहन करावा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुरवठा विभाग, वजनमाप विभाग आणि HPCLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जानेफळ परिसरातील नागरिकांकडून होत आहे.












