अकोला (हॅलो बुलढाणा/ वृत्तसंस्था) रस्त्याच्या कामाची कोट्यवधींची निविदा मिळविण्यासाठी प्रत्यक्षात कार्यक्षम नसलेला हॉटमिक्स प्लांट कार्यरत असल्याचे भासवून प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप मे. G.H. Khandelwal, कंत्राटदार, अमरावती यांच्यावर करण्यात आला असून, अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांची सत्यता आणि त्यामागील संपूर्ण साखळीच आता तपासाच्या भोवऱ्यात आली आहे.
एफआयआरमधील माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला कार्यालयाने ई-निविदा सूचना क्र. ७/२०२६-२७ प्रसिद्ध केली होती. निविदेच्या अटींनुसार निविदाधारकाकडे Drum Mix Plant DM-50 कार्यरत स्थितीत असणे अनिवार्य होते.
G.H. Khandelwal यांनी निविदेसोबत सादर केलेल्या प्रमाणपत्रात सहाय्यक मुख्य अभियंता (यांत्रिकी), अमरावती यांनी १० नोव्हेंबर २०२५ रोजी प्लांटची पाहणी करून तो “efficient and in good working condition” असल्याचे प्रमाणित केल्याचे नमूद असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
मात्र याच प्लांटची सद्यस्थिती तपासण्यासाठी सार्वजनिक बांधकाम यांत्रिकी उपविभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. १५ सप्टेंबर २०२६ च्या अहवालात प्लांट कार्यरत आणि वर्केबल स्थितीत नसल्याचे तसेच त्यातून हॉटमिक्स मटेरियलचे उत्पादन करून काम करणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले, असा दावा तक्रारीत आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये प्लांट कार्यक्षम असल्याचे प्रमाणपत्र नेमक्या कोणत्या तपासणीवर देण्यात आले? प्रत्यक्ष पाहणी झाली होती का? आणि सप्टेंबर २०२६ मध्ये प्लांट निकामी अवस्थेत आढळला, तर तो कधीपासून बंद होता?
तक्रारीत संबंधित प्रमाणपत्र खरे आहे की नाही, ते सक्षम अधिकाऱ्यानेच जारी केले की त्यामध्ये फेरफार झाला, याचा सखोल तपास करण्याची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे.
या प्रकरणात सिटी कोतवाली, अकोला येथे अप.क्र. २४/२०२६ नोंदवून BNS मधील संबंधित कलमांनुसार तपास सुरू करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
आता चौकशीत केवळ कंत्राटदाराचेच नव्हे, तर प्रमाणपत्र जारी करणे, त्याची पडताळणी आणि निविदेत स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांच्या भूमिकेचेही धागेदोरे तपासले जाणार का? याकडे लक्ष लागले आहे.
हॅलो बुलढाणा या प्रकरणातील पुढील तपास आणि अधिकृत निष्कर्षांवर लक्ष ठेवून आहेत












Total Users : 3487753