बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रस्त्यावर शांतता होती… मात्र प्रत्येकाच्या हातातील मेणबत्ती विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधातील धगधगता संताप व्यक्त करत होती! NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीमार आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुलढाण्यात शांततापूर्ण कँडल मार्च काढण्यात आला.
या मार्चमध्ये विद्यार्थी, युवक, पालकांसह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा मार्च कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनासाठी किंवा विरोधासाठी नसून विद्यार्थ्यांचा दबलेला आवाज देशाच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी नागरिकांनी पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, प्रभावित विद्यार्थ्यांना मदत आणि आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना शासनाने न्याय देण्याची मागणी केली. तसेच पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली.
“विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे, संवाद हवा!”, “पेपरफुटी थांबवा, विद्यार्थ्यांना न्याय द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणला. प्रतीक जाधव, ऋषभ साळवे, अविनाश ऊर्फ टिल्लू गोरले आणि अतुल झिने यांनी मार्चचे आयोजन केले.











