spot_img
spot_img

आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा ‘आक्रोश’ रस्त्यावर! जळगाव जामोदमध्ये एल्गार; ‘मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र!’

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मातंग समाज, बुलढाणा शुक्रवारी (दि. १७ जुलै) आक्रमकपणे रस्त्यावर उतरला. संत तुकाराम महाराज चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढत शासनाला थेट इशारा देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या निवेदनाची आठवण करून देत अनुसूचित जातींचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अ, ब, क, ड प्रवर्गानुसार उपवर्गीकरण करून आरक्षण लागू करावे, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, तसेच सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

मोर्चात संजय बोदडे, राजेश घोडे, कैलास खंदारे, बबनराव बोदडे, शांताराम तायडे, वामनराव बोरे, वामनराव बोरसे, वामनराव गुडेकर, विजय सानोने, कृष्णा नाटेकर, महादेव ढगे आणि महेंद्र वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले.

शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पोलीस निरीक्षक सचिन बागुल व एपीआय शेडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!