सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा आणि नुकसानभरपाई अजूनही प्रलंबित असल्याने आता शेतकऱ्यांचा संताप जनता दरबारात धडकणार आहे. शेतकरी योद्धा कृती समिती, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या १८ जुलै रोजी होणाऱ्या जनता दरबारासाठी तहसील प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.
सन २०२५ मधील अतिवृष्टीग्रस्तांना पीक विमा व आर्थिक मदत तातडीने द्यावी, बंद पर्जन्यमापक यंत्रणा सुरू करून प्रत्येक ग्रामपंचायतीत आधुनिक यंत्रणा बसवावी, २६ फेब्रुवारी २०२३ च्या अतिवृष्टी-गारपीटीची मदत वितरित करावी आणि रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत, अशा प्रमुख मागण्या समितीने केल्या आहेत.
विशेष म्हणजे, नुकसानग्रस्त शेतांची प्रतापराव जाधव यांनी स्वतः पाहणी केली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा थेट सवाल आहे नुकसान पाहिलं, मग न्याय कधी मिळणार?
सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी आवाज बुलंद करावा, असे आवाहन समितीने केले आहे.










