मेहकर (हॅलो बुलढाणा) लहान चिमुकले कुणी भेटल्यावर चॉकलेट मागतं, कुणी खाऊ… तर कुणी आपल्या गावासाठी किंवा समाजासाठी काहीतरी मागतं! मेहकर मतदारसंघात अशाच दोन वेगळ्या मागण्यांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिलेल्या तत्काळ प्रतिसादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मेहकर येथील जिजामाता माध्यमिक कन्या शाळेतील एका विद्यार्थ्याने स्वतःसाठी चॉकलेट किंवा भेटवस्तू न मागता थेट शाळेकडे जाण्यासाठी पक्का रस्ता मागितला. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मागणीची आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने दखल घेतली. अवघ्या दीड महिन्यात आमदार निधीतून सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्ण करण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात चिखलातून वाट काढणाऱ्या विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांची मोठी गैरसोय दूर झाली. विद्यार्थ्याच्या समाजाभिमुख मागणीला मिळालेला हा प्रतिसाद केवळ विकासकाम नसून विद्यार्थ्यांच्या भावनांचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शाळेच्या वतीने आमदार खरात यांचा सत्कारही करण्यात आला.
दरम्यान, १७ जुलै रोजी आयोजित जनसंवाद कार्यक्रमात दाभा येथील जगदंबा माता भजनी मंडळाच्या माता-भगिनींनी भजनासाठी टाळ, मृदंग आणि वीणा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार खरात यांनी क्षणाचाही विलंब न करता ही मागणी मान्य करत आवश्यक वाद्ये भेट स्वरूपात प्रदान केली.
एका बाजूला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करणारा पक्का रस्ता, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची वारकरी आणि संतपरंपरा जपण्यासाठी भजनी मंडळाला वाद्यांची साथ… या दोन्ही घटनांमुळे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्यपद्धतीची मतदारसंघात चर्चा रंगली आहे. ‘मागणी मनापासून असेल, तर प्रतिसादही तितकाच तत्पर!’ असा संदेश या दोन घटनांतून समोर आला आहे.










