संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) प्रेमसंबंधातून झालेला आंतरजातीय विवाह… त्यानंतर अमेरिकेत सुरू झालेला संसार आणि पुढे कॅनडापर्यंत पोहोचलेलं नातं… मात्र या वैवाहिक आयुष्याला काही वर्षांतच गंभीर वळण लागल्याचा आरोप संग्रामपूर येथील एका 36 वर्षीय विवाहितेने केला आहे. पतीसह सासू, सासरे आणि ननंद यांनी फ्लॅट, सोने-चांदी व दागिन्यांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा, तसेच जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याचा गंभीर आरोप महिलेने तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
पोलीस नोंदीनुसार, कथित घटनांचा कालावधी 1 जून 2016 ते 1 नोव्हेंबर 2023 असा नमूद करण्यात आला असून, या प्रकरणाची माहिती 16 जुलै 2026 रोजी रात्री 12.12 वाजता पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा विवाह 2015 मध्ये मुंबईतील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणासोबत झाला. प्रेमसंबंधातून झालेल्या या विवाहानंतर ती पतीसोबत अमेरिकेत वास्तव्यास गेली. सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू होता; मात्र त्यानंतर फ्लॅट तसेच सोने-चांदी आणि दागिन्यांच्या मागणीवरून तिचा कथित छळ सुरू झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
महिलेच्या आरोपानुसार, एप्रिल 2022 मध्ये ती संग्रामपूर येथे माहेरी आली असताना पतीने घरासमोरील रस्त्यावर वाद घालत तिचा जातीवाचक शब्दांत अपमान केला. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये पतीला कॅनडात नोकरी मिळाल्यानंतर ती त्याच्यासोबत कॅनडाला गेली; मात्र तेथेही फोनद्वारे मागण्या आणि मानसिक त्रास सुरूच राहिल्याचा दावा तिने केला आहे.
सततच्या मानसिक तणावामुळे आपली तब्येत बिघडली आणि दोन वेळा गर्भपात झाल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केल्याचे समजते. नोव्हेंबर 2023 पासून ती माहेरी राहत असून, पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत संबंध असल्याचा आरोपही तिने केला आहे.
या प्रकरणात भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 323, 34, 498-A आणि 504, तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 मधील कलम 3(1)(r), 3(1)(s) आणि 3(2)(va) अंतर्गत नोंद करण्यात आल्याचे उपलब्ध पोलीस दस्तऐवजात नमूद आहे.
अमेरिका ते कॅनडा आणि अखेर संग्रामपूरपर्यंत पोहोचलेल्या या वैवाहिक वादातील आरोपांमुळे परिसरात चर्चा रंगली आहे. मात्र तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असून, आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










