spot_img
spot_img

शिक्षक शाळेत, पत्नी पार्लरमध्ये… अन् चोरट्यांनी साधला ‘तो’ डाव! भाडेकरूच्या खोलीतून बेडरूममध्ये एन्ट्री; डोणगावात सोनं-रोकड लंपास

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) घरातील सदस्य बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना डोणगावातील छत्रपती नगर, खंडोबा परिसरात १६ जुलै रोजी घडली. या धाडसी घरफोडीने परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी विठ्ठल रामचंद्र शिंदे हे शिक्षक असून सकाळी ७ वाजता शाळेत गेले होते. त्यांचा मुलगाही शाळेत गेला होता. सकाळी सुमारे १०.४५ वाजता त्यांच्या पत्नी घराला सेफ्टी लॉक लावून पार्लरमध्ये गेल्या. दुपारी १२ वाजता त्या घरी परतल्या असता बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि लॉकर उघडे असल्याचे दिसून आले.

चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या भाडेकरूच्या खोलीचे कुलूप तोडून त्या खोलीतून शिंदे यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केल्याचा संशय आहे. कपाटातून सुमारे २१ ग्रॅम सोन्याचे विविध दागिने आणि ९ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!