मलकापूर (हॅलो बुलढाणा) बालकामगारांना कामावर जुंपणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाच्या कृतीदलाने मलकापूर शहरात धडक कारवाई करत दोन आस्थापनांमधून तब्बल तीन बालकामगारांची मुक्तता केली. संबंधित आस्थापना चालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने बालकामगार ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
१५ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या विशेष धाडसत्रात मुक्ताईनगर रोडवरील मल्टी ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिस येथे एक बालकामगार, तर ख्वाजा गरीब नवाज गॅरेज येथे दोन बालकामगार काम करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. कृतीदलाने तातडीने तिन्ही बालकामगारांची सुटका करून त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली.
बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमांतर्गत संबंधित आस्थापना चालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचा इशाराही कामगार विभागाने दिला आहे.
कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत यांच्या निर्देशानुसार व कामगार अधिकारी शैलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुकाने निरीक्षक योगेश गोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रशासनाच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे मलकापूरातील बालमजुरीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.















Total Users : 3299790