जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) घरमालक वरच्या मजल्यावर गाढ झोपलेले… आणि खाली चोरटे कपाट फोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने गोळा करण्यात व्यस्त! एवढ्यावरच न थांबता दुसऱ्या घरातून चक्क रिकामा गॅस सिलेंडरही उचलून नेल्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद शहरात उघडकीस आली आहे. एकाच रात्री दोन घरांवर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
गणेश नगर, वाडी खुर्द येथील 59 वर्षीय मधुकर महादेव पुदाके हे पत्नीसमवेत रात्री घराच्या वरच्या हॉलमध्ये झोपले होते. पहाटे उठल्यानंतर हॉलचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मित्राला फोन करून दरवाजा उघडल्यावर खाली येताच धक्कादायक दृश्य समोर आले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 80 हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 1 लाख 5 हजारांचा ऐवज लंपास केला होता.
याच परिसरातील शिक्षक कॉलनीत एकनाथ साळोकार यांच्या बंद घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. तेथून सोन्या-चांदीचे दागिने आणि इंडेन कंपनीचा रिकामा गॅस सिलेंडर असा 18 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला.
एका रात्रीत दोन घरे फोडून ‘हाताला लागेल ते घेऊन’ चोरटे पसार झाल्याने जळगाव जामोद पोलिसांसमोर आता या चोरट्यांना शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.










