spot_img
spot_img

पत्नी माहेरी गेली अन् पती पेट्रोलची बाटली घेऊन थेट पोलीस चौकीत! ‘तिला आणून द्या, नाहीतर स्वतःला जाळतो’; देऊळगाव महीत भरदिवसा थरार

देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) पत्नी माहेरी निघून गेल्याच्या रागातून एका मद्यधुंद व्यक्तीने हातात पेट्रोलची बाटली घेऊन थेट देऊळगाव मही पोलीस चौकी गाठत स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिल्याने रविवारी भरदिवसा मोठा थरार निर्माण झाला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

पोलिसांच्या लेखी रिपोर्टनुसार, १२ जुलै रोजी दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान गोकुळ गणेश घोरपडे (वय ३१, रा. नजीक पांगरी, ता. बदनापूर, जि. जालना) हा हातात बिसलेरीच्या बाटलीत पेट्रोल घेऊन पोलीस चौकीत पोहोचला. “माझी पत्नी माहेरी गेली आहे, तिला माझ्याकडे आणून द्या; अन्यथा अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेईन,” अशी धमकी देत त्याने जोरदार आरडाओरड आणि धामधूम सुरू केली.

पोलिसांनी त्याची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत असलेला अनिल बाबुराव तांबे (वय २५, रा. सातेफळ, जि. जालना) यानेही चौकीत आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप आहे.

दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कलीम शफी देशमुख करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!