मोताळा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील बोराखेडी येथील पुलावर आज सोमवारी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सारोळापीर येथील सागर बावस्कर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सागर बावस्कर हे कोतवाल म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
पावसाळ्यात रस्ते निसरडे होणे, पुलावर पाणी साचणे तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा ताबा सुटण्याच्या घटना वारंवार घडतात. बोराखेडी येथील पूलही अपघातप्रवण ठरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. सोमवारी सागर बावस्कर हे दुचाकीने पुलावरून जात असताना त्यांचा जोरदार अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी घटनेत ते गंभीर जखमी झाले होते.
स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांच्या मृत्यूने सारोळापीर परिसरात शोककळा पसरली आहे










