spot_img
spot_img

पारडीत दारू माफियांचं ‘राज’ अन् महिलांच्या वाट्याला अश्लील शिव्या… संयमाचा बांध फुटताच थेट जानेफळ पोलीस ठाण्यावर धडक; आता अड्डे उद्ध्वस्त होणार की पुन्हा आश्वासनांचा ‘पेग’?

जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) पासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी गावात अवैध गावठी दारूविक्रीने अक्षरशः उच्छाद मांडल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावातील रस्ते, चौक आणि वस्त्यांमध्ये मद्यपींचा धिंगाणा वाढल्याने संतप्त महिलांनी अखेर थेट जानेफळ पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. दारूचे अड्डे तातडीने उद्ध्वस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशाराच महिलांनी पोलिसांना दिला.

महिलांच्या आरोपानुसार, पारडीमध्ये राजरोसपणे गावठी आणि अवैध दारूचा साठा करून विक्री केली जात आहे. दारूच्या नशेत मद्यपी भररस्त्यात अश्लील भाषा वापरत असून, आरडाओरड आणि शिवीगाळ करत असल्याने महिला व मुलींना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांतील कमाई दारूत उधळली जात असल्याने घराघरात वाद, भांडणे आणि आर्थिक संकट वाढत आहे.

रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी एकजूट दाखवत जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदारांना लेखी निवेदन देऊन अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची आणि दारू अड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली.

पोलिसांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी पारडीतील दारू माफियांवर प्रत्यक्षात धडक कारवाई होते की पुन्हा केवळ आश्वासनांचा ‘पेग’ दिला जातो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!