मोताळा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील खामखेड गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील नळाची पाईपलाईन फुटलेली असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने महिलांना आणि लहान मुलांना दूरवरच्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.
गावातील पाण्याच्या टाकीत गढूळ व दूषित पाणी साचले असून, हेच पाणी नळांद्वारे नागरिकांना सोडले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुमित माकोडे यांनी केला आहे. दूषित पाण्यामुळे गावातील महिला आणि मुले आजारी पडत असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
खामखेड गावासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी विहीर उपलब्ध आहे. त्या विहिरीपासून नवीन पाईपलाईन टाकून तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा करता येऊ शकतो. मात्र ग्रामसेवक विनोद काळवाघे आणि सरपंच यांनी अद्याप ठोस पाऊल उचललेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.











Total Users : 3534199