बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या शेकडो वारकरी आणि भाविकांवर ओढवणारा मोठा अनर्थ अखेर टळला आहे. वारीत वाटप करण्यासाठी आणण्यात आलेल्या शीतपेयाच्या बाटल्यांमधील पेय प्राशन केल्यानंतर दोन परिचारिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे समोर आली. यातील एका परिचारिकेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर या दोन परिचारिका कार्यालयीन काम संपवून घरी निघाल्या होत्या. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेरील एका हॉटेलमधून शीतपेय विकत घेतले. बसस्थानकात वाहनाची प्रतीक्षा करत असताना दोघींनी ते पेय प्राशन केले. काही क्षणांतच त्यांना मळमळ, अस्वस्थता आणि त्रास सुरू झाला. त्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठले; मात्र तोपर्यंत दोघींचीही प्रकृती गंभीर बनली होती.
डॉक्टर आणि परिचारिकांनी तत्काळ उपचार सुरू केले. प्रकृती अधिक बिघडल्याने दोघींना पुढील उपचारासाठी लातूर आणि अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. पूजा जाधव यांना लातूरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हेच शीतपेय शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीत सहभागी वारकरी आणि भाविकांना मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यासाठी साठवण्यात आले होते. घटना उघड होताच अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाने धाव घेत सर्व बाटल्या जप्त केल्या.
या शीतपेयाचा पुरवठादार कोण? बाटल्या कुठून आल्या? वाटपाचे नियोजन कोणी केले? आणि पेयातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली? या सर्व प्रश्नांचा तपास सुरू असून, दोन परिचारिकांच्या सतर्कतेमुळे शेगावच्या पालखीत मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे.















Total Users : 3299910