spot_img
spot_img

देऊळघाटच्या शेतात सकाळी दबा धरून बसली १६ जणांची टोळी… आईच्या किंकाळ्या ऐकून मुलं धावली अन् पुढच्याच क्षणी लोखंडी सळ्यांनी रक्ताचा सडा; तरुणाचे बोट तोडले!

देऊळघाट (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहरालगतच्या देऊळघाट येथे शेताच्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलांवर १५ ते १६ जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना आज सकाळी घडली. मारहाणीत एका तरुणाच्या हाताचे बोट तुटले असून, इतर जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा बेगम अब्दुल मजीद या सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान आपल्या शेतात गेल्या होत्या. शेतात नुकतीच पेरणी झालेली असताना काही जण ट्रॅक्टर घेऊन शेतातून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पिकांचे नुकसान होईल, म्हणून आशा बेगम यांनी विरोध केला. याच कारणावरून संतप्त झालेल्या टोळीने त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

पीडित महिलेने मुलांना फोन करून बोलावल्यानंतर ते आईच्या मदतीसाठी शेतात पोहोचले. मात्र, आरोपींनी लोखंडी सळई व इतर शस्त्रांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. या मारहाणीत एका मुलाचे बोट तुटले. महिलेचा विनयभंग करून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

भरदिवसा घडलेल्या या घटनेने देऊळघाट हादरले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!